खेड:- तालुक्यातील कुळवंडी- देऊळवाडी येथे नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन बायकोने आपल्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ती एवढ्यावर थांबली नाही तर पेटत्या अवस्थेत घराबाहेर काही अंतरावर उभ्या असलेल्या नवऱ्याला मिठी मारली. या घटनेत महिला गंभीर भाजली, नंतर तिचा मृत्यू ओढवला. पतीही भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून या प्रकरणी तपास पोलीस करत आहेत.
शिल्पा मंगेश निकम (वय 40) असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून तिचा नवरा मंगेश बाळाराम निकमही जखमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुळवडी देऊळवाडी येथे सोमवारी (22) मध्यरात्री आपल्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याने महिला 99 टक्के भाजली. तिने पतीला त्याच अवस्थेत मिठी नारल्याने पती भाजला अन् गोंधळ उडाला. महिलेचा अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. नवरा देखील 60 टक्के भाजून गंभीर जखमी झाला आहे. मंगेश यांच्यावर खेडमधील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.