दापोली:- दापोलीत दोन बहिणींना बंदुकीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. गावाच्या विरोधात खोट्या तक्रारी देता आणि गावाला त्रास देता असे म्हणत पुन्हा गावातील लोकांविरोधात खोट्या तक्रारी दिल्यातर दोन्ही बहिणींना जिवंत ठेवणार नाही, अशी बंदुकीचा धाक दाखवून धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याविरोधात दाभोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार शगुप्ता सहीबोले यांनी पोलिस स्थानकात दिली. त्यानुसार अहमद सहीबोले ( ६५ ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाभोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शगुप्ता सहीबोले व त्यांची बहीण अशा दोघीही भोपण साहिलनगर येथे राहतात. १० ऑगस्ट रोजी सकाळी ११.१५ च्या सुमारास गावातीलच अहमद सहीबोले ( ६५ ) यांनी त्यांना वरीलप्रमाणे धमकी दिल्याची तक्रार शगुप्ता सहीबोले यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक सागर कांबळे करीत आहेत.