रत्नागिरी:- तालुक्यातील शिरगाव गायवाडी येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. शेतातील विहिरीत तरंगताना हा मृतदेह आढळून आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
यशवंत कृष्णा भरणकर (53, गायवाडी शिरगाव) असे बेपत्ता असलेल्या प्रौढाचे नाव होते. 3 जुलै पासून हे बेपत्ता झाले होते. त्यांना दारूचे व्यसन होते. 3 जुलै रोजी त्यांनी घरात बोलताना आपल्याला आयुष्याचा कंटाळा आला आहे असे सांगत घरातून बाहेर पडले होते. घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्थानकात यशवंत भरणकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सोमवारी दुपारच्या सुमारास शिरगाव शेतीफार्म येथील काम करणारे कामगार शेतातून चालत निघाले होते. यावेळी एका कामगाराला शेतातील विहिरीत यशवंत यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याची माहिती शिरगाव पोलीस पाटील पूजा शिंदे यांना देण्यात आली. पोलीस पाटील शिंदे यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.