देवरूख येथे एसटी बसमधून महिलेची पर्स लांबवली

देवरूख:- देवरूख-संगमेश्वर बसफेरीमध्ये फणसवळे येथील महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. ही बस सह्याद्रीनगर येथून थेट देवरूख पोलीस स्थानकात आणून प्रवाशांची तपासणी करण्यात आली. देवरूख बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजही पाहण्यात आले.

फणसवळेतील समिक्षा संदीप पवार या कामानिमित्त रविवारी देवरूख येथे आल्या होत्या. काम आटोपून, त्या दुपारी १२ च्या सुमारास देवरूख- संगमेश्वर (गाडी क्र. एमएच- १४, बीटी-२०९६) या बसमधून जात होत्या. एसटी बसमध्ये चढेपर्यंत त्यांच्या पर्समध्ये असलेल्या छोट्या पर्समध्ये २ सोन्याच्या अंगठ्या, कानातील पट्टया, रोख रक्कम होती, असे त्यांचे म्हणणे आहे. बसमध्ये चढताना सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब झाली आहे. तिकीट काढण्यासाठी पवार यांनी पर्स उघडली असता सोन्याचे दागिने, रोख रक्कम असलेली छोटी पर्स गायब असल्याचे दिसून आले. ही बाब चालक, वाहकांच्या निदर्शनास आणून देताच बस सह्याद्रीनगर येथून थेट देवरूख पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी सर्व प्रवाशांची तपासणी करून त्यांचे नाव व मोबाईल नंबर लिहून घेतला. यानंतर ही बस संगमेश्वरच्या दिशेने रवाना झाली. यानंतर बसस्थानक परिस्रातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. यामधून काही निष्पन्न झालेले नाही.