संगमेश्वर:- प्रतिनिधीदेवरूख व साडवली परिसरात करोना पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी तोडण्यासाठी देवरूख नगरपंचायत हद्दीतील व्यापारी व नागरिकांनी उद्या (दि. २७ ऑगस्ट) ते ३ सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्याची काळजी घेण्यासाठीच सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. देवरूख बाजारपेठ बंद ठेवावी का, यासाठी नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांनी नगरपंचायतीत व्यापारी व नागरिकांची बैठक बोलवलेली होती. या बैठकीत दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आठ दिवसांचा लाॅकडाउन जाहीर करण्यात आला. हा लाॅकडाउन नागरिक, व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने जाहीर केलेला आहे. यामुळे कोणावरही कसलेही बंधन राहणार नसून आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपणच योग्य तो निर्णय घ्यायचा आहे, असे सूचित करण्यात आले. या लाॅकडाउनला देवरूख व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत, क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे. गणपती विसर्जनाच्या दिवसापासून हा लाॅकडाउन होणार आहे. लाॅकडाउन काळात मेडिकल सेवा नियम व अटी पाळून सुरू राहणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होलसेल दूध विक्रेते छञपती शिवाजी महाराज चौक, बसस्धानक व माणिक चौक येथे दूध विक्री करणार आहेत.