देवरुखात प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

देवरुख:- शहरातील भोईवाडी येथील ५६ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शशिकांत मनोहर वैद्य असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. वैद्य यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप वैद्य यांनी खबर दिली आहे. शशिकांत वैद्य हे घरी एकटेच राहत असत. शनिवारी सकाळी वैद्य न उठल्याने प्रदीप वैद्य पाहण्यासाठी गेले. यावेळी आतील खोलीत शशिकांत वैद्य हे नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. प्रदीप वैद्य यांनी याची खबर तात्काळ पोलिसांना दिली.

यानुसार परि. सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, प्रशांत मसुरकर, संदीप जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. देवरुख ग्रामीण रुग्णालयात वैद्य यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.