देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवळे कॅम्पजवळ अवैधरित्या देशी, विदेशी आणि गावठी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीला देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक कार आणि एक लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई २२ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली.
देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सदानंद नागवेकर (वय ३२) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, आरोपी सागर चंद्रकांत आंग्रे (वय ३४) याला देवळे कॅम्पजवळ असलेल्या एका टपरी आणि समोरील रस्त्यावर अवैधरित्या दारू विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी १,०५,६७०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त केलेल्या मालामध्ये १,००,०००/- रुपये किमतीची लाल रंगाची मारुती अल्टो ८०० एलएक्सआय कार (क्रमांक एमएच ०२ सीव्ही ५८६९), १३३०/- रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ०७ सीलबंद काचेच्या बाटल्या, २०८०/- रुपये किमतीच्या मॅकडॉल नं. १ ओरिजिनल कंपनीच्या विदेशी दारूच्या १८० मिलीच्या १३ सीलबंद काचेच्या बाटल्या, ४२०/- रुपये किमतीच्या देशी दारू टँगो पंचच्या ०६ सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्या, ७००/- रुपये किमतीच्या देशी दारू संत्रा जीएमच्या १० सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्या आणि ११४०/- रुपये किमतीची पांढऱ्या रंगाच्या पोत्यात प्लास्टिकच्या पाऊचमध्ये भरलेली ११ लिटर ४०० मिली गावठी दारू (३८ पाऊच) यांचा समावेश आहे.
संशयित सागर आंग्रे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.