देवधे येथे वणव्यामुळे आंबा, काजू कलमे होरपळून लाखोंचे नुकसान

लांजा:- तालुक्यातील देवधे येथील मणचेकरवाडी, बौद्धवाडी येथे लागलेल्या वणव्यामुळे आंबा आणि काजू कलमे होरपळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. महावितरणच्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन हा वणवा लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तातव्यातील देवधे मणचेवाडी बौद्धवाडी या परिसरातून महावितरणची थ्री फेजची विद्युत वाहिनी गेलेली आहे. त्यामुळे शॉर्टसर्किटने आग लागून वणवे लागत आहेत. या वणव्यात या परिसरातील आंबा, काजू बागांचे नुकसान होत आहे. यापूर्वी दि. ११ मार्च रोजी वणव्यामुळे आंबा आणि काजू कलमांचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर महेश गुरव यांनी लांजा येथील महावितरणच्या उपविभागाकडे निवेदन दिले आहे.

या आगीत अकबर नाईक यांची ५०० आंबा कलमे जळून खाक झाली आहेत. तसेच धोंडू राघो कांबळे यांची १५० काजू कलमे, महेश निळू गुरव यांची १०० कलमे, प्रभाकर भिकाजी कांबळे यांची १०० काजू आणि दहा नारळाची झाडे, प्रकाश सावजी गुरव यांची ३०० काजू कलमे, अंकिता गुरव यांची २०० काजू कलमे आणि विलास कांबळे यांची ५० काजू कलमे जळून गेली. महावितरणने ही नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त बागायतदारांनी केली आहे.