दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी यांचा सर्जिकल स्ट्राईक; प्रत्येक स्वच्छतागृहाची पाहणी

रत्नागिरी:- गुरुवारी पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहांमध्ये असलेल्या अस्वच्छतेचा प्रश्न निकाली निघावा यासाठी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांची बैठक स्वच्छते बाबत निष्काळजीपणा कराल तर कारवाई होईल अशा सूचना दिल्या. शुक्रवारी स्वतः जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक विभागातील स्वच्छतागृहांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अचानक भेट देत अपर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी, आपत्ती निवारण कार्यालय, उपजिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, अभिलेख कक्ष, तहसीलदार कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालय, पर्यटन‍ विकास महामंडळ, विशेष लेखा परिक्षक कार्यालय, परिसर आणि परिसरातील शौचालय, स्वच्छतागृहांमधील स्वच्छतेची पाहणी केली. शिवाय कार्यालय प्रमुखांना देखील स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवण्याबाबत सूचना केल्या.

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी शुक्रवारी दुपारी अचानकपणे जिल्हाधिकारी परिसरातील प्रशासकीय कार्यालय इमारतींना भेट देत पाहणी केली. यावेळी अनावश्यक जुने साहित्य, अस्ताव्यस्त ठेवलेले साहित्य याबाबत सूचना करत जुने साहित्य निर्लेखीत करण्यास सांगितले. स्वच्छ, सुंदर, प्रसन्न वातावरणात माणसाचे मन देखील प्रफुल्लीत राहते. परिणामी त्याचा कामकाजावर सकारात्मक परिणाम राहतो. प्रत्येकांनी आपले कार्यालय आणि परिसर नियमित स्वच्छ ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक कार्यालयांनी आपआपला मजला स्वच्छ ठेवावा. संपूर्ण इमारत स्वच्छ राहण्यास मदत होईल. त्यासाठी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे सांगून कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड मध्ये येण्याबाबतही त्यांनी निक्षून सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, स्वीय सहाय्यक संदीप सावंत सोबत होते.