खेड:- जमीन मालकाची परवानगी न घेता दांडगाईने व त्रास देण्याच्या हेतूने जमिन बळकावण्याचा प्रयत्न करणार्या एकावर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद दत्ताराम मोरे (77, आंबडस, गावठाण वरचीवाडी, खेड) यांनी पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार संशयित मारुती चंदू मोरे (खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे आंबडस गावठाण येथे दत्ताराम मोरे यांची जमीन आहे. या जमिनीमध्ये जून 2022 पासून मारुती मोरे हा कंदमुळाची लागवड करत आहे. मात्र याची खबर दत्ताराम मोरे यांना त्याने दिलेली नाही. तसेच कंदमुळांची शेती केल्यानंतर त्यांच्या जमिनीत काटेरी कुंपणही घातले आहे. ते काढण्याचे सांगूनही त्याने आजपर्यंत न काढल्याने अनधिकृतपणे शेतीत प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.