दुचाकी अपघातात तरुणाच्या मृत्युप्रकरणी सुपरवायझरवर गुन्हा दाखल

चिपळूण:- चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या ३० वर्षीय तरुणाच्या अपघात प्रकरणी ईगल कंपनीच्या सुपरवायझर विरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण कृष्णा घाणेकर ( रा. कोंडमळा ) हा दुचाकीने कोंडमळा येथे जात असताना पॉवर हाऊस येथे आला असता चिपळूणकडे येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक वंदना कनोजा यांनी येथील पोलिस  ठाण्यात फिर्याद दिली होती. ईगल कंपनीचा सुपरवायझर कन्हैयालाल पारनाथ वर्मा ( ३८, रा . उत्तरप्रदेश ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पॉवर हाऊस येथे खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. यावेळी सुपरवायझरने रस्त्याचे काम सुरू असल्याबाबत वाहनधारकांना समजण्यासाठी दोन्ही दिशांना दिशादर्शक फलक किंवा सेफ्टीकोन ठेवला नाही. तसेच काम सुरू असल्याबाबत लाल झेंडा दाखविण्यासाठी कामगार न ठेवता त्याने कामात निष्काळजीपणा केल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.