दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमेश्वर:-  तालुक्यातील हातीव फणसस्टॉपजवळ दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात अफरोज इकबाल साटविलकर (वय ३३ रा., हातीव मुस्लिम मोहल्ला) या तरुणाचा ३ एप्रिल रोजी उपचारादरम्यान रत्नागिरी येथे निधन झाले.

याबाबत देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अफरोज साटविलकर हा सुझुकी मोटारसायकल (एमएच 08 बी एफ 77 20) घेऊन देवरुखातून हातीवकडे निघाला होता. फणस स्टॉप येथे तो आला असता त्याची दुचाकी घसरली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला रत्नागिरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान ३ एप्रिल रोजी त्याचे निधन झाले.

अफरोजच्या अपघाती निधनामुळे हातीव मुस्लीम मोहल्ल्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघाताची देवरूख पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे अधिक तपास करीत आहेत.