रत्नागिरी:- दुचाकीसमोर कार आडवी लावत दुचाकीवरील बहीण-भावावर चौघांनी जीवघेणा हल्ला केला. तावडीतून सुटून बहीण-भावाने जंगलातून पळत जाऊन आपला जीव वाचवला. चौघांनी केलेल्या मारहाणीत भावाच्या नाकाचे हाड मोडले असून बहिणीच्या डोक्यालाही दुखापती झाल्या आहेत.
शहरानजिक काजरघाटी धारेवर ही घटना घडली. मारहाणीत जखमी बहीणभाऊ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तोणदे येथे राहणारे बहीण-भाऊ एमआयडीसीतील एका कंपनीत कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. दुचाकीवरून हे दोघेही गुरुवारी २.३० वा. च्या धारेवर आले असता एक कार या दुचाकीसमोर आडवी लावण्यात आली. कारमधून चौघेजण उतरले आणि बहीण-भावाला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काठीने व लोखंडी फाईटने मारहाण करताना भावाच्या डोक्यावरील हेल्मेट काढून दोघांना त्याच हेल्मेटने मारण्यात आले. यामध्ये बहिणीच्या डोक्याला जोरदार दुखापत झाली आहे. लोखंडी फाईटने मारहाण झाल्याने भावाच्या नाकावरील हाड मोडले आहे. ही हाणामारी सुरू असताना बहीण-भावाने आपली सोडवणूक करत जंगलातून पळ काढला. या हाणामारीवेळी बहिणीच्या कानातील सोन्याची रिंग गहाळ झाली असल्याचेही पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.