चिपळूण:- तालुक्यातील आगवे येथे मंगळवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर वहाळफाटा येथील सर्व्हिस रोडवर मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून रस्त्यावर पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या या मृत्यूला मोटारसायकल चालक पतीस जबाबदार धरत त्याच्यावर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र यशवंत भुवड (रा. आगवे, लिंबेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शर्मिला रवींद्र भुवड (वय ४१, आगवे चिपळूण) असे मृत महिलेचे नाव आहे. रवींद्र भुवड मोटारसायकलने पत्नी शर्मिला भुवड व मुलगी निधी भुवड (१४) यांना आगवे ते सावर्डे रेल्वेस्टेशन सर्व्हिस रोडने घेऊन जात असताना वहाळफाटा येथे अपघात घडला. या वेळी मोटारसायकलवर मागे बसलेल्या शर्मिला भुवड या रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.