दुचाकीच्या टायरवर लघुशंका केल्याच्या रागातून खुनी हल्ला

दोन गटातील अंतर्गत संघर्ष ; तलवारीने केले वार

रत्नागिरी:- शहरातील क्रांतीनगर येथील खुनी हल्ल्याचे कारण पोलिस तपासात पुढे आले आहे. अंतर्गत संघर्ष असलेले दोन गट आमनेसामने आले आणि त्यातून शब्दाने शब्द वाढत जाऊन एकमेकांना धमक्या देत धकलाबुकल झाली. तेव्हा राजेंद्र वीटकर याने दुसऱ्या गटातील एकाच्या दुचाकीवर लघुशंका केली. हे कृत्य चांगलेच झोंबल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी त्याच्यावर तलवारीने वार केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली.

राजेंद्र वीटकर (वय ३२, रा. क्रांतीनगर) असे तलवारीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र हल्ल्यानतंर तिन्ही संशयित फरार होते. पोलिस त्यांच्या शोधत होते.
शहरातील क्रांतीनगर येथे ६ जूनला हा खुनी हल्ला झाला होता. पूर्वाश्रमीचे मित्र असलेले दोन गट आमनेसामने आले होते. एकाने दुसऱ्या गटातील एकाच्या दुचाकीवर लघुशंका केली. याचा जाब विचारला गेला आणि त्यातूनच हा वाद विकोपाला गेला. हा वाद हमरातुमरीवर आला. त्या वेळी गुरूनाथ उर्फ गोट्या नाचणकर या तरुणाला शिवीगाळ करून ढकलाबुकल केली होती. हे प्रकरण शांत झाले, असे वाटत होते; मात्र त्याच रात्री गोट्या नाचणकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी राजेंद्र विटकर याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर संशयित मारेकरी फरार होते. त्यामुळे नेमका हल्ला कोणत्या कारणावरून झाला हे स्पष्ट होत नव्हते.
संशयितांचा शोध सुरू असतानाच पोलिसांनी गुरूनाथ प्रताप नाचणकर (वय २६, रा. मिरजोळे), सुशील सुनील रहाटे (वय ३३, रा. लक्ष्मीनगर कोळंबे) आणि सौरभ अर्जुन सावंत (वय ३२, रा. सुपलवाडी नाचणे) यांच्या मुसक्या आवळल्या.