दुकानात काम करणाऱ्या महिलेनेच केला 4 लाखांचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर येथे एका दुकानात काम करणाऱ्या महिलेनेच जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

मारुती मंदिर येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये स्टॉक इन्चार्ज असलेल्या महिलेनेच रोख रक्कम व 43 वेगवेगळ्या मॉडेलचे डिस्प्ले असा एकूण 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल घेउन पोबारा केला. ही घटना 9 जून ते 10 जुलै 2024 या कालावधीत घडली आहे.

या महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात रविवार 1 सप्टेंबर रोजी तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार, मारुती मंदिर येथील अरिहंत स्पेस सेंटरमध्ये सॅमसंगचे सर्व्हिस सेंटर आहे. त्यामध्ये संशयित महिला स्टॉक इन्चार्ज म्हणून नोकरीला होती. 9 जून ते 10 जुलै या कालावधीत तिने सॅमसंग कंपनीच्या मोबाईलचे वेगवेगळ्या मॉडेल्सचे एकूण 43 डिस्प्ले आणि रोख 50 हजार 335 रुपये असा एकूण 3 लाख 87 हजार 23 रुपयांचा मुद्देमाल कंपनीला कोणतीही कल्पना देता परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी घेउन गेली. तिच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 316 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.