दुकानांवर मराठी पाट्या न लावल्यास कारवाई

जिल्हाधिकारी; न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात

रत्नागिरी:- राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत शनिवारी (ता. २५) संपत आहे. या पार्श्वभूमीवर दुकानांवर देवनागरी लिपित ठळक मराठीत पाटी नसल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जाईल. त्यासाठी दुकानदारांना कोणतीही नोटीस दिली जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी दिली.

रत्नागिरीतील दुकानदारांनी आपल्या दुकानावर ५ डिसेंबरपूर्वी मराठी पाटी लावावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२३ च्या कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला कलम ७ नुसार दुकानांवर मराठी भाषेतून ठळक अक्षरांत नामफलक लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्ह्यात सर्व दुकानदारांनी मराठीत बोर्ड लावावे, असे आवाहन वारंवार केले जात आहे. आता तर थेट प्रशासनाने याबाबत सर्व दुकानें आणि आस्थापनांना इशारा दिला आहे. मराठीत फलक लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याची मुदत काल संपली आहे. त्यामुळे आजपासून प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.