दुकानदारांना धमकावणाऱ्या नॅशनल अँटीकरप्शन कमिटीच्या तोतया जिल्हाध्यक्षासह तिघांना अटक

रत्नागिरी:- “तुमचं दुकान अनधिकृतपणे सुरु आहे. तुमच्या दुकानात दारु विकली जाते, शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले?” असं धमकावून दुकानदारांना लुटणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. अँटीकरप्शन विभागाच्या नावाने तोतयागिरी सुरु असल्याच्या अनेक तक्रारी रत्नागिरीतील गुहागर तालुक्यात करण्यात आल्या होत्या. नॅशनल अँटीकरप्शन कमिटीच्या तोतया रत्नागिरी जिल्हाध्यक्षासह तिघांना अटक केल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

गुहागर तालुक्यातील खाडीपट्टी भागातील वेळणेश्वर, अडूर, बोऱ्या भागात गेल्या दोन दिवसापासून हा प्रकार सुरु होता. “तुमचं दुकान अनधिकृतपणे सुरु आहे. तुमच्या दुकानात दारु विकली जाते, शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले? आम्ही अँटी करप्शन ऑफिसकडून आलो आहोत. तुमच्याबाबत काही तक्रारी आल्या आहेत. त्या जर मिटवायच्या असतील तर आम्हाला पैसे द्या” असे सांगत पाच ते दहा हजार रुपये घेत या टोळक्याने अनेकांना गंडवले होते.

याबाबतच्या तक्रारी काल दिवसभरात गुहागर पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपास करत या तोतयागिरी करणाऱ्या पथकातील तिघांना ताब्यात घेतले. अँटिकरप्शनच्या नावाने तोतयागिरी करणारे हे तिघे जण चिपळूण तालुक्यातील रहिवाशी आहेत. चिपळूण तालुक्यातील कापसाळचे संजय वाजे, अमित महाडिक, तर पेढे परशुराम येथील तुषार तावडे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांनी अशाच प्रकारे अनेक ठिकाणी लुटल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम करत आहेत. या तिघा जणांनी अजून कुठं काय केलं आहे का? याचा तपास गुहागर पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईने गुहागर तालुक्यातून अनेक नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.