दिवाळी ठरली बचतगटांना आर्थिक पाठबळ देणारी

रत्नागिरी:- सण समारंभात हंगामी व्यवसाय करणार्‍यांसाठी दिवाळी ही पर्वणीच असते. यामध्ये महिला बचतगट आघाडीवर असून, यंदाही दिवाळी फराळसह, आकाश कंदिल, डेकोरेटीव्ह पणत्या, दिवाळी कीट तयार करुन विक्री करण्यात महिला अग्रेसर राहिल्या आहेत. बचत गटाच्या सर्वच उत्पादनांच्या खरेदीला ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याने बचत गटांमध्ये दिवाळीनिमित्त कोट्यवधींची रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. दिवाळीमुळे बचतगटांच्या अर्थकारणाला खर्‍या अर्थाने झळाळी मिळत आहे.

महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी शासनस्तरावर विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यापैकी एक माध्यम म्हणजे महिला बचत गट होय. यावर्षी दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याने नागरिकांमध्ये सणाचा उत्साह दांडगा राहणार हे लक्षात घेऊन महिला बचत गटांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली होती. सण समारंभात हंगामी व्यवसाय करणार्‍यांसाठी दिवाळी सण हा व्यावसायिक पर्वणीच असतो. यामध्ये महिला बचतगटाच्या माध्यमातून घरगुती स्वरुपात छोटेमोटे व्यवसाय करणार्‍या महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.

यंदाही दिवाळी फराळासह आकाश कंदील, डेकोरेटीव्ह पणत्या, दिवाळी किट तयार करुन विक्री करण्यात महिला आघाडीवर राहिल्या आहेत. ग्राहकांमधून महिला उद्योजिकांच्या या उत्पादनांना पसंती देण्यात आली. देवघरातील पुजेपासून माहेरच्या फराळाच्या डब्यापर्यंत सर्वत्र बचतगटाच्या उत्पदनांनी आपले स्थान मिळवले आहे. महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या आकाश कंदिलांनी अनेकांच्या घरांमध्ये दिवाळीची शोभा वाढवली आहे. पणत्या, दिवाळी किटची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत आहे. बाजारपेठेत बचतगटांच्या फराळांची रेलचेल अद्याप सुरुच आहे. उत्पादित मालाला मिळत असल्याने बचत गटांच्या अर्थकारणाला दिवाळीची झळाळी मिळाली आहे.