दिवाळीच्या कालावधीत महावितरणकडून 674 घरे प्रकाशमान

रत्नागिरी:- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन वीज जोडणीची मागणी करणाऱया अर्जदारांना तत्पर वीज जोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला. प्रत्येक घर प्रकाशमान व्हावे, या भूमिकेतून ग्राहकांची प्रकाशाची दिवाळी साजरी होण्याच्या ध्येयातून महावितरणच्या कोकण परिमंडळामार्पत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील 674 ग्राहकांना नवीन वीज जोडणी देत प्रकाशाची भेट देण्यात आली.

महावितरणच्या कोकण परिमंडलाने 15 दिवसांपूर्वी ‘प्रत्येक घरी दिवा-प्रत्येक घरी दिवाळी’ हा संकल्प केला. त्या भूमिकेतून महावितरण कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी अधिकारी-कर्मचाऱयांना प्रोत्साहित केले. अधीक्षक अभियंता स्वप्निल काटकर (रत्नागिरी मंडल), अधीक्षक अभियंता विनोद पाटील (सिंधुदुर्ग मंडल) यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित जबाबदारी सर्व विभागीय कार्यकारी अभियंता व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाऱयांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यासाठी काटेकोर नियोजन आखून महावितरण मुख्यालयाकडून आवश्यक वीज मीटर तातडीने उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात आली.
दिवाळी म्हणजे दीपांचा, प्रकाशाचा उत्सव. अशा या दीपोत्सवाच्या शुभमुर्हूतावर अनेकजण आपल्या स्वप्नांतील नवीन घरात प्रवेश करतात. त्यामुळे अशा अर्जदारांच्या आनंद अधिक व्दिगुणित करण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन वीज जोडणीची मागणी करणाऱया त्या अर्जदारांना तत्पर वीज जोडणी देण्याचा संकल्प महावितरणने केला होता. ग्राहकांची प्रकाशाची दिवाळी साजरी होण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या महावितरणच्या अभियंते व जनमित्रांनी तातडीने कार्यवाही हाती घेतली. त्या नवीन वीज जोडण्यांच्या कार्यवाहीसाठी गेले सलग 15 दिवस सातत्यपूर्ण परिश्रम महावितरणच्या यंत्रणेने घेतले.
जिह्यात 465 तर सिंधुदुर्ग जिह्यात 209 ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्याची कार्यवाही करत पकाश देण्याचे नाते जपले. अस्तित्वातील विद्युत यंत्रणेतून रत्नागिरी जिह्यात 346 तर सिंधुदुर्ग जिह्यात 146 ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली व नवीन विद्युत यंत्रणा उभारणीअंतर्गत रत्नागिरी जिह्यात 119 तर सिंधुदुर्ग जिह्यात 63 ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी महावितरणच्या कार्यवाहीविषयी समाधान व्यक्त केले.