एसटीला मिळाली गती ; १२८८ फेऱ्या, ६० टक्के कर्मचारी हजर
रत्नागिरी:- रत्नागिरी एसटी विभागात आज ३४६१ पैकी १७९४ म्हणजे ५० टक्के कर्मचारी व एकूण सुमारे ६० टक्के कामगार कामावर हजर झाले आहेत. ३२२ कर्मचारी साप्ताहिक सुट्टी, अधिकृत दौऱ्यावर होते. आता फक्त १३३४ कर्मचारी हजर होणे बाकी असून, ते दोन दिवसांत हजर होणार आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत १२८८ फेऱ्या विभागातून सोडण्यात आल्या. यातून सुमारे ७० हजार प्रवाशांनी प्रवास केला.
प्रत्येक आगारात रोजंदारीवरील चालक हजर झाले आहेत. सर्वाधिक देवरूखमध्ये १७ व चिपळुणात १६ चालक असे विभागात ६४ जण हजर झाले. ते सुद्धा वाहतूक करत आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार आणि मंडणगड ३०, दापोली ११६, खेड १४८, चिपळूण २८८, गुहागर १०४, देवरूख १४४, रत्नागिरी ग्रामीण १८४, रत्नागिरी शहरी १४६, लांजा २६, राजापूर १०२ अशा १२८८ फेऱ्या सोडण्यात आल्या. यामध्ये रात्रीपर्यंत आणखी ४०० फेऱ्या वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
आज प्रशासकीय ३०१, कार्यशाळा ३९४, चालक ३६१, वाहक २६१ आणि चालक तथा वाहक ४७७ हजर होते. चालक, वाहकांची संख्या वाढल्याने आज १२८८ फेऱ्या सोडण्यात आल्या. ९ ते १९ एप्रिल या कालावधीत चालक ४०७, वाहक २४४, चालक तथा वाहक ६४८, कार्यशाळा १९८ आणि प्रशासकीय ५६ असे एकूण १५५३ कर्मचारी हजर झाले आहेत. आजपर्यंत एकूण १४५ अपिल अर्ज प्राप्त झाले आहेत.