प्रजासत्ताक दिनाच्या परेडला लावणार उपस्थिती
रत्नागिरी:- दिल्ली येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्यासाठी राज्यातून प्रत्येक जिल्ह्यामधून एका सरपंचांची निवड करण्यात आली असून, विविध कामगिरीचा आढावा घेत ही निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता अंकुश जोशी यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
केंद्र शासनाच्या सुचनानुसार राज्याच्या पंचायत राज विभागाच्या संचालकांनी ही निवड केली आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर करण्यात आलेली अंमलबजावणीचा आढावा घेऊन ही निवड करण्यात आली आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमधून 34 सरपंच विशेष अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहण्याचा मान केंद्र शासनाने दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरीनजीकच्या पोमेंडी बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता अंकुश जोशी यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पोमेंडीसह कारवांचीवाडी गावामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.