दापोली आगारातील आठ कर्मचारी सेवेतून बडतर्फ

रत्नागिरी:- गुहागर- मंडणगड पाठोपाठ दापोली आगारात बडतर्फीची कारवाई सुरु झाली आहे. उर्वरीत दापोली आगारातील ८ कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये दापोली आगारात कर्मचार्‍यांमध्ये चलबिचल वाढली आहे.

एस. टी. संपात फूट पडून इतर जिल्ह्यांमध्ये कर्मचारी कामावर रुजू होत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र कामावर रुजू होणार्‍या कर्मचार्‍यांचे प्रमाण अत्यल्प आहे. वारंवार आवाहन करुन देखील कर्मचार्‍यांनी प्रशासनासह परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला धुडकावून लावले आहे. त्यामुळे एस. टी. कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी मंडणगड व गुहागर आगारातील ३ कर्मचार्‍यांना बडतर्फ केले होते. त्यापाठोपाठ बुधवारी दापोली आगारातील ८ कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईमुळे दापोली आगारात कर्मचार्‍यांमध्ये हलचल माजली आहे.

दरम्यान रत्नागिरी आगारात १४ व १५ जानेवारी दरम्यान कारवाईला सुरुवात होणार आहे. काही कर्मचार्‍यांच्या अंतिम  सुनावण्या १३ रोजी संपणार असून १४ तारखेपासून बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात होणार आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांची बडतर्फी होण्याची शक्यता आहे.

सध्या रत्नागिरी आगारातून ३ फेर्‍या सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये पावस २ व कोल्हापूर १ अशा फेर्‍या सुटत आहेत. उद्या गुरुवारपासून त्यात भर पडणार असून नव्याने रत्नागिरी आगारातून रत्नागिरी-चिपळूण अशी फेरी सुरु होणार आहे.