दापोलीत सिलिंडरचा स्फाेट; पती-पत्नी जखमी

दापोली:- स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेऊन पती-पत्नी भाजून जखमी झाल्याची घटना दापाेली शहरातील रूपनगर काॅम्प्लेक्स येथे शुक्रवारी दुपारी घडली. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. सुदैवाने त्यांची दाेन मुले शाळेत गेल्याने ती या दुर्घटनेतून वाचली.

अविनाश शिर्के (४०) आणि अश्विनी शिर्के (३५) असे जखमी दाम्पत्याची नावे आहेत. शहरातील रूपनगर काॅम्प्लेक्समध्ये शिर्के कुटुंब राहत आहे. शुक्रवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमाराला घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरने पेट घेतला आणि स्फाेट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, काही कळायच्या आत घरातील साहित्याची नासधूस झाली.

या स्फाेटामुळे शिर्के यांच्या खाेलीचा मुख्य दरवाजा व त्याच्या बाजूची भिंत शेजारील माने यांच्या दरवाजावर पडली. शेजारी राहणाऱ्या जाधव यांच्या घरालाही या स्फाेटाचे हादरे बसले. तसेच घराच्या खिडकीवरील ग्रील निखळून खाली पडले. त्यामुळे सदनिकेच्या खाली उभ्या असणाऱ्या चारचाकीचे किरकाेळ नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू हाेता.

या घटनेत जखमी झालेल्या अविनाश शिर्के व अश्विनी शिर्के यांना प्रथम दापाेली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तिथून पुढील उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले आहे.