दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे येथील बंदरामध्ये- उटंबर येथील एका नौकेला लाटांच्या तडाख्यामुळे पूर्णपणे जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत वित्तहानी प्रचंड झाली असून जीवितहानी मात्र टळली आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात मासेमारी करणारी उटंबर येथील चांगा दामा भोईंनकर यांची IND – MH – 4- MM 1 अन्नपूर्णा’ ही दोन सिलेंडरची नौका गुरुवारी ५ मे २०२२ रोजी रात्री उशिरा हर्णे बंदरातून सर्व सामान भरून मासेमारीसाठी गेली होती. सध्याच्या काळात मासेमारी करिता खलाशी देखील मिळत नसल्याने चांगा भोईनकर व त्यांचा मुलगा नंदकुमार असे दोघेच नौकेवर मासेमारीला गेले होते. आज ७ मे २०२२ रोजी सकाळी हे दोघेही हरेश्वरमध्ये मासेमारी करत होते. त्याचवेळी अचानक नोकेवरील मशीन बंद पडले. त्यामुळे हे दोघेही खूप चिंतेत पडले. त्याचवेळी त्यांनी जवळ असलेल्या पाजपंढरी येथील हेमा परशुराम चोगले यांची ‘अल हम्द’ या नौकेला आवाज मारून जवळ बोलावले व सदरच्या नौकेने दोरी बांधून भोईंनकर हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपली नौका हर्णे मध्ये घेऊन यायला निघाले. नौका घेऊन अगदी कनकदुर्ग किल्ल्याजवळ आले होते.
गेले ८ ते १० दिवस समुद्रातील वातावरण खूपच खराब झाले ८ आहे. सकाळी उत्तरेकडून जोरदार वारे वाहत होते. कनकदुर्ग किल्ल्याजवळ आल्यावर लाटांचे जोरदार तडाखे बसत होते. त्याचमुळे मोठ्या लाटांचे तडाखे बसून नौकेची नाळच तुटली आणि नौकेत पाणी शिरून नौका जाग्यावरच बुडाली. त्यामुळे नौकेच पूर्णपणे नुकसान झाले आहे. बुडाल्यावर त्याच चोगले यांच्या नौकेच्याच साहाय्याने किनाऱ्याजवळ आणली गेली . नौका बुडाली कळताच हर्णे फत्तेगड येथील सर्व मच्छीमार वाचवण्यासाठी धावत आले तसेच ओमकार मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन श्री हरेश कुलाबकर तातडीने हजर झाले. फत्तेगडावरील मच्छीमार बांधवांनी नौका बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. नौका ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला परंतु बुडालेली नौका अजूनही बाहेर काढण्यात अपयश येत आहे. अजूनही नौका बुडालेल्या अवस्थेत हर्णे बंदरातच आहे. पूर्णपणे जलसमाधी मिळाल्यामुळे सर्व सामान वाहून गेले आहे. तसेच मारून आणलेली मासळी देखील वाहून गेली आहे. सदरच्या घटनेचा मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी दीप्ती साळवी यांनी पंचनामा केला. अंदाजे सदर नौकेला जलसमाधी मिळाल्यामुळे ५ लाखांचे नुकसान झाले आहे.