दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड येथील पोस्टमास्तर पुर्वी तुरे यांनी पोस्ट कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली. तुरे यांच्या आत्महत्येने दापोलीत एकच खळबळ उडाली आहे. पुर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील मोठी गोडीबाव येथील रहिवासी होत्या.
शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्यांच्या पतीला पोस्टाच्या कामानिमित्त जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या. त्या सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पतीने शोध सुरू केली. त्यांना रात्री १० वाजता मुरुड पोस्ट कार्यालय आतून बंद असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना पाचारण केले. पोस्ट कार्यालयाच्या खिडकीतून पाहिले असता त्यांना पुर्वी तुरे यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले.
पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे. मात्र तुरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. या घटनेचा अधिक तपास सध्या दापोली पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.