दापोलीत बंद फ्लॅट फोडून ६ लाखांचा मुद्देमाल लंपास

दापोली:- घरातील सर्वजण मुंबईत गेले आणि चोरट्यांनी डल्ला मारत घरातील ४ लाख ६७ हजार रुपयांच्या रोकडसह एकूण ५ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने दापोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ एप्रिल पासून हबीब अहमद युसुफ सावंत (वय ५३, रा. हाजीरा युसूफ लँडमार्क, मच्छी मार्केट दापोली) हे दि. २ मे पर्यंत आपले घर बंद करून मुंबईला गेले होते. सदर घटना घडल्याची हकीकत त्यांची भावजय अकिला सावंत यांनी त्यांना कळविल्यानंतर हबीब सावंत यांनी तात्काळ दापोली गाठत दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली.

हबीब सावंत यांच्या बंद घरातील लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील ७५ हजार रुपयांचा तीन तोळ्याचा सोन्याचा हार, ३७ हजार रुपयाची दीड तोळ्याची चैन तसेच ४ लाख ६७ हजार रुपयाची रोख रक्कम असे ५ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलिसांना अज्ञात चोरट्या विरोधात भादवी ५५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरीचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.