दापोलीत बंडखोर उमेदवार खानविलकर यांचे आघाडीच्या मोरे यांना मत; दापोली नगराध्यक्षपदी ममता मोरे

दापोली:- दापोली नगराध्यक्ष पदासाठी बंड केलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडीत स्वतःचे मतदान हे पक्षाच्या आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवार ममता मोरे याना करून सभागृहात बंड अखेरीस मागे घेतले.

नगरपंचायत दापोली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया आज (दि. ११) रोजी दापोली नगर पंचायत येथे पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी खालिद रखांगे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यात नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या आणि शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या अधिकृत उमेदवार ममता मोरे यांना १७ पैकी १४ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. या वेळी शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी शिवानी खानविलकर यांना फक्त अपक्ष दोन नगरसेविकानी मतदान केले. तर भाजपच्या नगरसेविका तटस्थ राहिल्या.

यावेळी शिवानी खानविलकर यांनी स्वतःचे मत देखील शिवसेना आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवार यांना दिले. त्यामुळे शिवानी खानविलकर यांनी आघाडी विरुद्ध केलेले बंड शमले काय? अशी चर्चा नगर पंचायतीत रंगली होती.

शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दापोली नगर पंचायत नगराध्यक्ष पदासाठी ममता मोरे यांचे नाव निश्चित करण्याआधीच शिवसेनेच्या शिवानी खानविलकर यांनी आमदार योगेश कदम यांना मानणाऱ्या दोन अपक्ष बंडखोर उमेदवारांना सूचक-अनुमोदन घेतले होते. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करून आघाडी विरोधात बंड पुकारले.

तर आघाडी आणि शिवसेनेबाबत उलट सुलट माध्यमांशी प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे शिवसेना पक्षाने कठोर निर्णय घेत सभागृहत जो नगरसेवक पक्ष विरोधी जाईल अशा नगरसेवकावर कारवाई केली जाईल असा पक्षा आदेश बजावला. त्यामुळे बहुदा शिवानी खानविलकर यांनी आपले बंड मोडीत काढले असावे.