दापोलीतून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या उत्तर प्रदेशातील तरुणाला अटक 

दापोली:- दापोलीतून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या संशयितास पोलिसांच्या पथकाने मानखुर्द ( मुंबई) येथून या मुलीसह ताब्यात घेतले. त्या मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 १७ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने  तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक शीतल पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी तातडीने तपासाला गती देऊन मुलीचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केल्यावर ही मुलगी मानखुर्द येथे असल्याचे स्पष्ट झाले. उपनिरीक्षक शीतल पाटील यांचे नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल सातार्डेकर, चव्हाण, झावरे यांच्या पथकाने मुंबई येथे जाऊन या मुलीस व तिचे अपहरण करणारा संशयित साबीर अली (२७, मुळचा उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले. या दोघानाही दापोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून संशयित साबीर अली याला अटक करण्यात आली आहे.