कोरेच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेऊन ठोस कारवाई करण्याची मागणी
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने भरून धावत असताना देखील दादर -रत्नागिरी पॅसेंजर गाडी बंद करण्यात आली आहे. ही गाडी पुन्हा चालू करण्यासाठी रत्नागिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्ट मंडळाने मनसेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांना काल (८ जानेवारी) निवेदन दिले असून, यावर लवकरात लवकर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने भरून धावत असताना तसेच कोकण रेल्वे मार्गावर आधीच कोकणासाठी गाड्यांची कमतरता असताना कोकणातील ही एक्स्प्रेस बंद करून उत्तर प्रदेशातील गाडी चालवली जाणार असल्याने हा कोकणी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) रत्नागिरीतर्फे कोकण रेल्वेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून, त्यावेळेत आता कायमस्वरूपी दादर-गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे हे निषेधार्ह आहे.
रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर ही पॅसेंजर १९९६-९७ पासून सुरू झाली. पुढे ती रत्नागिरी-दादर पॅसेंजर म्हणून चालवली जाऊ लागली. मार्च २०२० पर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत होती. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वसई, नालासोपारा, विरार आणि गुजरात दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानक सोयीचे असल्यामुळे आणि दिव्यापुढे सर्व स्थानकांवर थांबत असल्यामुळे ही गाडी सर्वाधिक लोकप्रिय होती; परंतु करोना काळात मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी सुरू करताना मार्गाची क्षमता नसल्याचे आणि वक्तशीरपणाचे कारण देत बंद केली. त्यानंतर नवीन शून्य आधारित वेळापत्रकात दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सुरू केली. परंतु, रत्नागिरी पॅसेंजरच्या वक्तशीरपणात सुधारणा झाली नाही. आता नव्या वेळापत्रकात या गाडीच्या वेळेत दादर-गोरखपूर गाडी धावणार आहे. हा वक्तशीरपणाचा निकष दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडीला का नाही, असा सवाल मनसेचे तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांनी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊ विचारला.
दिवा ते दादर मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने त्याच मार्गावर दादर-गोरखपूर (चार दिवस) आणि दादर-बालिया (तीन दिवस) विशेष रेल्वेगाड्या (दैनिक) सुरू केल्या. म्हणजेच रेल्वे प्रशासनाने कोकणासाठी दूजाभाव धोरण अवलंबले असून, याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना धिक्कार करत असून येथील प्रवाशांच्या व जनतेच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या या मनमानी व दुजाभाव कारभाराविरोधात व्यापक जनआंदोलन उभारू आणि यातून होणाऱ्या परिणामाला कोंकण रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कोंकण रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
दादर -रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा चालू करण्यासाठी रत्नागिरी मनसेच्या शिष्ट मंडळाने मनसेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांना ८ जानेवारी रोजी निवेदन दिले असून, यावर लवकरात लवकर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी तालुका सचिव अभिलाष पिलणकर, महिला सेना तालुका अध्यक्षा सौ. अश्विनी चव्हाण, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, विभाग अध्यक्ष अक्षय मोरे, सोम पिलणकर तसेच कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई उपस्थित होते.