दाढीवाल्या माजी सदस्याची साळवी स्टॉप येथे जोरदार धुलाई

शहरात रंगली चर्चा; मिऱ्यावासीयाला मारहाण अंगाशी

रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वीच सत्तेतील एका पक्षात प्रवेश केलेल्या जिल्हा परिषदेच्या एका माजी सदस्याची जोरदार धुलाई झाल्याचा प्रकार घडल्याची रंगतदार चर्चा सुरू आहे. दाढीमुळे चर्चेत असलेल्या त्या पदाधिकाऱ्याला पळवून कपडे फाटेपर्यंत मारल्याची खुमासदार चर्चा सुरू आहे.

दाढी वाढवत वेगळ्या आविर्भावात वावरणाऱ्या या पदाधिकाऱ्याने एका कामगाराला दमदाटी करत मारहाण केली. तो नेमका मिऱ्यावरचा होता. हे मिऱ्यावासीयांना समजल्यानंतर त्या पदाधिकाऱ्याची अक्षरशः धुलाई केली.

शहरातील साळवीस्टॉप येथे एक बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामाच्या ठिकाणी त्या माजी जिल्हा परिषद सदस्याचा वाद झाला. दाढी कुरवाळीत त्या सदस्याने बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या काही लोकांना मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आपली छाती फुगवून हा पदाधिकारी रूबाबात उभा होता. आपल्या गावातील व्यक्तीला मारहाण झाली आहे, अशी माहिती काही क्षणात शहरानजीकच्या मिऱ्यावासीयांना समजली. तसा जमाव आपल्या गाड्या घेऊन साळवी स्टॉप परिसरात दाखल झाला. या जमावाने त्या माजी सदस्याला तुफान हाणले. यामध्ये त्या पदाधिकाऱ्याच्या अंगावरचे कपडे फाटले. जमावाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून त्याने तेथून पळ काढला; पण साळवी स्टॉप परिसरात जमावाने पाठलाग करून त्या माजी सदस्याला चांगलाच चोपल्याच चर्चा शहरात नाक्यानाक्यावर रंगत आहे.