चिपळूण:- दागिने पॉलिश करुन देतो असे सांगत महिलेचे 1 लाख 2 हजार 800 रुपयांचे दागिने हातोहात लांबवल्याचा प्रकार गुरुवारी स. 9.30 वा. च्या सुमारास घडला. याबाबतची फिर्याद मोहम्मद ताबीश सादिक हुसेन शेख यांनी येथील पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांच्या घरात दोन व्यक्ती आल्या. त्यांनी सोने, चांदीचे दागिने पॉलिश करुन देतो, असे सांगून त्यांच्या आईच्या हातातील चांदीची अंगठी पॉलिश करुन दिली. यानंतर विश्वास बसलेल्या शेख यांनी आपल्याकडील 65 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, 37 हजार 800 रुपयांची सोन्याची बांगडी पॉलिश करण्यासाठी दिल्या. हे दागिने एका पातेल्यात ठेवून त्यावर झाकण ठेवून रासायनिक प्रक्रियेसाठी ठेवलेले आहेत असे सांगून घरातून पोबारा केला. काही वेळाने पातेल्यातील दागिने पाहिले असता त्यामध्ये दागिनेच नसल्याचे लक्षात आले. त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.