दहावीत 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण तरीही मुलीने घेतला टोकाचा निर्णय 

रत्नागिरी:- दहावीच्या निकालात मालगुंड मधील विद्यार्थीनीला 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. घरातील सर्वजण या यशाने आनंदित असताना केवळ कॉलेज कुठले आणि साईड कुठली यावरून वादविवाद झाले आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली. गणपतीपुळेत देवदर्शनाला गेलेल्या आई बाबांना घरी आल्यावर समोर दिसलेल्या प्रसंगाने धक्काच बसला. 

तालुक्यातील मालगुंड येथे अल्पवयीन मुलीने घरात कोणीही नसताना ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 11 वा.सुमारास उघडकीस आली. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सानिका अशोक सोनार (16,रा.मालगुंड,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिचे वडील अशोक सोनार यांनी जयगड पोलिसांना खबर दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी 9.30 वा.सुमारास अशोक सोनार आणि त्यांची पत्नी देवदर्शनानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यानंतर अंदाजे तासाभराने अशोक सोनार घरी परतले असता त्यांना सानिका घरातील वाशाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी तातडीने तिला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकिय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. याबाबत अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.