दररोज पाणी पुरवठा करताना जलतरण तलावाचे आरक्षण कायम ठेवा: मिलिंद किर

रत्नागिरी:- पाऊस सुरु झाला असून शीळ धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर रत्नागिरी शहराला 24 तास पाणीपुरठा करावा. त्याचबरोबर साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाचे आरक्षण आहे तेच म्हणजे जलतरण तलावच ठेवले जावे. सध्याच्या जलतरण तलावाची क्षमता वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद कीर यांनी केली आहे.

रत्नागिरी शहराच्या नवीन नळपाणी योजनेत शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरणात समाधानकारक पाणीपुरवठा झाल्यानंतर दिवसभर पाणीपुरवठा केला जावा, अशा मागणीचे निविदेन रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना दिले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शीळ धरण आणि पानवल धरण हे शहर पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत आहेत. शीळ धरणाकडून येणार्‍या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने पानवल धरणाकडून येणार्‍या जलवाहिनीचे 10 ते 20 टक्के काम शिल्लक असल्याचेही कीर यांनी यावेळी सांगितले.

साळवी स्टॉप येथे आरक्षण क्र. 115 मध्ये स्विमिंग पूल व बाजार केंद्राचे आरक्षण करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव गेला आहे. हे संपूर्ण आरक्षण जलतरण तलाव ठेवले जावे. सध्या जलतरण तलाव 25 मीटरचा असून तो पूर्ण क्षमतेचा म्हणजे 50 मीटरचा करावा, या मागणीचे निवेदनही रत्नागिरी नगर परिषदेला दिले असल्याचे कीर यांनी सांगितले. पूर्ण क्षमतेचा जलतरण तलाव झाल्यास राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपट्टू निर्माण होणार असल्याचेही राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्षांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, शहरअध्यक्ष नीलेश भोसले उपस्थित होते.