थ्रीप्सच्या प्रादुर्भावामुळे हापूस संकटात

रत्नागिरी:- हवामानातील बदलामुळे हापूसवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा हातात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, थ्रीप्सचा प्रादुर्भाव महागडी कीटकनाशके वापरूनही आटोक्यात येत नसल्याने बागायतदारही अडचणीत आले आहेत.

यावर्षी सर्वाधिक पालवीचे प्रमाण राहिले. 80टक्के पालवी असल्याने शेतकरी पालवी कडक होऊन मोहर येण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे थंडी पडलीच नाही. पहिल्या टप्प्यातील आंबा पीक दहा टक्केच होते. हा आंबा तयार होऊन बाजारात आला आहे. हा आंबा अल्प प्रमाणात आहे. 1500 ते 4500 रूपये पेटी दराने विक्री सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात असला तरी याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोहरच आला नाही. शेवटच्या टप्प्यात असलेल्या मोहराला फळधारणा झ्ााली. मात्र, हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्याचा प्रादुर्भाव झ्ााला. तुडतुड्यामुळे मोहर काळवंडला असून, थ्रीप्समुळे फळाचा आकार चिकू एवढा होऊन फळ गळही वाढली आहे.
महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही थ्रीप्स आटोक्यात येत नसल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा हातातून निसटला आहे. आतापर्यंत पीक वाचविण्यासाठी केला खर्च वाया गेल्याने बागायतदार हवालदिल झ्ााले आहेत. थ्रीप्स आटोक्यात न आल्यास पुढील वर्षीच्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. याबाबत कृषी विभागाकडून संशोधन करणे आवश्यक आहे.