‘थिक बिल्ड् ग्रीन पिजन’ पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करत चिपळुणात दाखल

चिपळूण:- थंडीचा ऋतू सुरु झाल्यावर मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षांचं राज्यात स्थलांतर होताना दिसतं. जानेवारी सुरु झाला की, बरेच सीगल पक्ष्याचे थवे कोकण प्रातांत येऊन स्थिरावतात. अशातचं सध्या चिपळूणमध्ये एका दुर्मिळ पक्षाचं दर्शन होताना दिसत आहे. हा पक्षी या आधी फारसा पाहिला नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. पोपटा आणि कबुतराच्या जातकुळीतला असलेला हा पक्षी सध्या पक्षीप्रेमींचं लक्ष वेधून घेत आहे. शहरातील वर्दळीच्या भर वस्तीत ‘थिक बिल्ड् ग्रीन पिजन’ या दुर्मीळ पक्ष्याचे नुकतेच दर्शन झाले आहे. पक्षी निरीक्षकांच्या मते थिक बिल्लू ग्रीन पिजन पक्षांचे थवे हजारो किलोमीटरचा प्रवास पार करत शहरात स्थिरावले आहेत.

थिक बिल्ड् ग्रीन पिजन या पक्ष्याचा गूळ अधिवास हा आसाम, मणिपूर, नागालँड अर्थात सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळख असलेल्या राज्यांपासून ते थेट बोर्नियो, सुमात्रा अशा प्रदेशात आढळतो. त्या ठिकाणच्या पोषक वातावरणामुळे त्यांच्या समुहाचा अधिवास त्या प्रदेशातून आहे. हिमाचलसारख्या थंड प्रदेशात वावरणारा हा पक्षी गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे चिपळुणातील शहराच्या मध्यवर्ती भर नागरी वर्दळीच्या वस्तीत आढळून आल्याने पक्षी निरीक्षकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. कबुतर प्रजातीमधील हा अत्यंत देखणा, सप्तरंगी पक्षी या खास ठिकाणच्या भागात असलेल्या झाडांवरील फळे खाताना ओंकार बापट यांच्या प्रथम निदर्शनास आला. कुतूहल म्हणून त्यांनी पक्षीमित्रांशी संपर्क करून माहिती दिली. तातडीने पक्षीमित्रांनी देखील संबंधित ठिकाणी जाऊन छायाचित्रण केले आणि हा पक्षी अनपेक्षितपणे चिपळुणात स्थलांतरित झाल्याचा सुखद आश्चर्याचा धक्का बसला.

या पक्ष्याचे स्थलांतर कुठे, कधी व कसे होते या बाबत पक्षी निरीक्षकांकडून अभ्यास सुरू असला तरी मात्र चिपळुणात हा पक्षी प्रथमच ऑन रेकॉर्ड स्पॉट झाला आहे. अर्थातच गेल्या अनेक वर्षांच्या पक्षी निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार हा पक्षी या वातावरणात स्थलांतरित कसा होऊन आला? मूळ अधिवास असलेल्या पोषक वातावरणातून चिपळूणात नेमका कसा आणि का आला? या बाबत अनपेक्षित आश्चर्य आहे. मात्र, त्या बरोबर चिपळूणच्या निसर्गसंपन्नतेचा आणि समतोल असलेल्या वातावरणाचा अभिमानही वाटत आहे. दुर्मीळ असा हा पक्षी सध्या गेले काही दिवस वड, उंबर, पिंपळ या झाडांची फळे खाऊन वास्तव्य करताना दिसून येत आहे. या पक्ष्यासोबत त्याचा जोडीदार आढळून येत आहे. हे दोन्ही पक्षी ग्रीन पिजन अर्थात राजपक्षी हरियाल यांच्या थव्यातून बावरताना दिसून येत आहे. त्याला आवश्यक असणारे पोषक वातावरण इथे नसताना देखील हा पक्षी अचानक व अनपेक्षितपणे या ठिकाणी कसा स्थलांतरित झाला.

याबाबत पक्षी अभ्यासक निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार ,या पक्ष्याचा मूळ अधिवास असलेल्या ठिकाणी झालेले नैसर्गिक व वातावरणातील बदल त्याचप्रमाणे वादळी वारे यामुळे हा पक्षी भरकटून दिशा चुकून आला असावा. गेल्या काही वर्षांचा पक्षी विषयात स्थलांतर, अधिवास एकूणच जीवनमान याचा अभ्यास करता चिपळुणात हा पक्षी आल्याची कुठेही नोंद आढळून येत नाही.