रत्नागिरी:- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांसह रत्नागिरीकरांनी जोरदार तयारी केली असली तरी गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ‘वॉच’ ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. मद्यप्राशन करुन वाहन चालवणार्यांवर विशेष लक्ष ठेवून कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. सागरी किनार्यांच्या सुरक्षेसाठीही 11 बोटी गस्तीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
रविवारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला आहे. उत्साहाच्या भरात गैरप्रकार होऊ नये या हेतून पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असून खास 31 डिसेंबरसाठी चार उपविभागीय पोलीस अधिकारी, 14 पोलीस निरीक्षक, 20 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 400 पोलीस कर्मचारी, 25 होमगार्ड यांच्यासह बीडीसी, क्युआरटी पथके तैनात करण्यात येणार आहेत.
मद्यप्राशन करुन गाड्या चालवणार्यांवर कडक कारवाईचा इशारा कुलकणीं यांनी दिला असून, 18 ब्रीथ अॅनालायझरचा वापर केला जाणार आहे. प्रमुख रस्त्यांवर या तपासण्या होणार आहेत. पर्यटकांची गर्दी असल्याने दापोली, गणपतीपुळे, गुहागर या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आली आहे. धोकादायक सागरी किनारी पोलीस यंत्रणांकडून सूचना दिल्या जात आहेत. सोशल मिडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ टाकणार्या लोकांवर कारवाईसाठीही विशेष पथक तयार करण्यात आले असून, त्यांच्याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. बॉम्ब स्कॉड पथकाद्वारे किनारपट्टींची तपासणी केली जाणार आहे. 11 बोटींद्वारे बाणकोटपासून, दाभोळ, मिरकरवाडा, नाटेपयर्र्त सागरी हद्दीमध्ये गस्त घालून किनारपट्टीवर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नववर्षानिमित्ताने नागरिकांनी पार्ट्या किंवा कार्यक्रम करताना दुसर्यांना त्रास होणार नाही, त्याचप्रमाणे ध्वनीक्षेपकाचा आवाज मर्यादीत राहील याची दक्षता घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
सन 2023 हे वर्ष पोलीस यंत्रणेसाठी बंदोबस्ताच्या दृष्टीने धकाधकीचे गेल्याची कबुली त्यांनी दिली. बारसूचे आंदोलन शांततेत पार पडले. शिमगोत्सव असो कि गणेशोत्सव हे उत्सवही रत्नागिरीकरांनी शांततेत पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हावासियांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात सध्या तीन हजार नेपाळ्यांची नोंद पोलीस दप्तरी आहे. अद्यापही अनेक मच्छीमार व आंबा बागायतदारांनी नेपाळी व्यक्तींची नोंद करावी असे आवाहनही त्यांनी केले. गेल्या वर्षभरात बांग्लादेशी घुसखोरांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अवैध सावकारी व छळवणूकी विरुध्द कारवाई आणखी तीव्र केली जाणार असून, नागरिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.