थकबाकीदार 569 ग्राहकांना महावितरणचा झटका; कनेक्शन तोडली

रत्नागिरी:- थकबाकी असलेल्या जिल्ह्यात 569 ग्राहकांना महावितरण कंपनीने मोठा झटका दिला आहे. वारंवार सांगून, आवाहन करूनही थकीत बिल न भरल्याने या सर्वांची वीज जोडणी तोडली आहे. फेब्रुवारी 2021 या एका महिन्यात 1 लाख 63 हजार ग्राहकांनी 19 कोटी 32 लाख एवढा वीज बिल भरणा केला आहे. मार्च 2020 मधील थकबाकीदार ग्राहकांवरच ही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

कोरोना महामारीने महावितरण कंपनीलाही अडचणीत आणले आहे. लॉकडाउनमुळे सर्व ठप्प झाले होते. अनलॉकनंतर महावितरण कंपनीने सलग तीन महिन्याची ग्राहकांना बिले दिली; मात्र बिलांचा आकडा पाहून अनेक ग्राहक चक्रावले. वाढीव बिलाचा विषय त्यानंतर सुरू झाला तो अजूनही गाजत आहे. विरोधी पक्षांनीदेखील याबाबत आवाज उठवला आणि बिलं न भरण्याचा अनेक ग्राहकांनी निर्धार केला. वसुलीवर याचा मोठा परिणाम होऊन महावितरणसमोर थकबाकी वाढतच गेली. महावितरण आर्थिक संकटात आल्यामुळे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणची थकीत बिलं भरा, असे आवाहन केले.

मात्र ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरण कंपनीने कठोर पावले उचलली आहेत. मार्च 2020 ची बिले अजून न भरणार्‍या ग्राहकांना कंपनीने झटका दिला आहे. जिल्ह्यातील अशा 569 वीज ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने तोडली आहे. मार्च 2020 मध्ये एकूण थकबाकीदार 38 हजार 104 ग्राहक आहेत. जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य आणि लघु उद्योगांची अजूनही 34 कोटी 65 लाख थकबाकी आहे.जमेची बाजू म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये जिल्ह्यातील 1 लाख 63 हजार 934 ग्राहकांनी एकूण 19 कोटी 32 लाख बिलांचा भरणा केला आहे.

दहा महिन्याचे बिल न भरणारे 41 हजार ग्राहक राज्यातील 41 लाख 7 हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील 80 लाख 32 हजार वीजग्राहकांनी गेल्या एप्रिल 2020 पासून जानेवारी 2021 या सलग 10 महिन्यांच्या कालावधीत एकाही महिन्याचे बिल भरलेले नाही.