वर्षानुवर्षे थकबाकी; 300 पेक्षा अधिक रडारवर
रत्नागिरी:- तीन ते चार वर्षे पाणीपट्टी थकविणार्या नळ जोडणीधारकांना पालिकेने ‘दे धक्का’ दिला आहे. शहरातील 313 जण पालिकेच्या हिटलिस्टवर असून त्यांची जोडणी तोडण्यात आली आहे. त्यांना पाण्याचा टँकरही देण्यास पालिकेने मज्जाव केला आहे. यामध्ये शासकीय कार्यालये, राजकीय नेते, हॉटेल व्यावसायिक, सिव्हिलचे वसतिगृह, बँक, महाविद्यालय, अपार्टमेंट, बीएसएनएल कंपनी आणि राजीवडा परिसरातील सर्वांत जास्त नळ जोडणीधारकांचा समावेश आहे. यांच्याकडे 23 लाख 74 हजार रुपये थकीत आहेत. जोवर पाणीपट्टी भरत नाहीत, तोवर पाणी दिले जाणार नाही, अशी पालिकेने ताकीद दिली आहे.
शहरामध्ये पालिकेची सुमारे साडे दहा हजार नळ जोडणीधारक आहेत. यांच्याकडून दरवर्षी सुमारे 6 कोटी पाणीपट्टी वसूल होते. मात्र वसुलीची टक्केवारी सुमारे 85 ते 90 टक्क्यावर असते. दहा ते पंधरा टक्के जोडणीधारक अनेकवेळा पाणीपट्टी थकवतात. त्यात गेल्यावर्षी कोरोनामुळे वसुलीवर मर्यादा आली होती. त्यामुळे पालिकेच्या पाणीपट्टीची थकबाकी वाढतच गेली. एक दोन वर्षे नव्हे तर चार-चार वर्षे पाणी पट्टी थकविणार्या 313 ग्राहकांची यादी पालिकेने तयार केली आहे. यांना अनेक नोटिसा देऊन, आवाहन करून देखील त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पालिकेने नळ जोडण्या तोडण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अनेक थकबाकीदारांच्या नळ जोडण्या तोडण्यात आल्या. पालिकेच्या या निर्णयामुळे कनेक्शनधारक धास्तावले आहेत.
नळ जोडणी तोडल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून काहींनी पाणी टँकरची मागणी केली. पालिकेच्या हे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने अशांना टँकर न देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचे आर्थिक वर्ष संपले तरी आतापर्यंत एकूण 6 कोटीच्या उद्दिष्टापैकी 4 कोटी म्हणजे 64 टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. पाणीपट्टी न भरणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.