रत्नागिरी:- महावितरण वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. ग्राहकसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या महावितरणची आर्थिक भिस्त ग्राहकांकडून दरमहा वसूल होणाऱ्या वीज बिलांच्या महसुलावर अवलंबून आहे. तेव्हा वापरलेल्या वीज सेवेचे मोल ग्राहकांनी नियमित व मुदतीत अदा करणे आवश्यक आहे. थकीत व चालू वीजबिलांचा भरणा वेळेवर करावा अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करा, तसे आदेश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिला आहे.
डांगे यांनी रत्नागिरी परिमंडल कार्यालयात रत्नागिरी व सिंधुदुर्ग मंडलातील सर्व कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांची काल आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठक प्रसंगी रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता विजय भटकर, अधीक्षक अभियंता माणिकचंद लवटे, अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डांगे म्हणाले, महावितरणचा कारभार ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर चालतो. आपल्या ग्राहकांना वीजसेवा देण्यासाठी महावितरणही एका ग्राहकाच्या भूमिकेत आहे. महावितरणला ग्राहकांना वीज पुरविण्यासाठी निर्मिती कंपन्यांकडून ती वीज खरेदी करावी लागते. निर्मिती केंद्रापासून ग्राहकांपर्यंत विजेचे वहन पारेषण कंपन्याच्या विद्युत यंत्रणेतुन करावे लागते. वीज खरेदीसह पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे कोट्यावधी रुपयांचे दायित्व सध्या महावितरणवर आहे. त्यासोबतचं दुसरीकडे वीजग्राहकांकडे खूप मोठया प्रमाणात थकबाकी आहे. महावितरणवर दैनंदिन खर्च भागविण्याची कसरत करताना थकबाकी व कर्जाचे दुहेरी आर्थिक संकट ओढवल्याने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी वीज सेवेचा मोबदला वेळेत अदा करून सहकार्य करणे गरजेचे आहे.
ग्राहक वापरलेल्या इतर सर्व सेवांची देणी वेळेत अदा करतात. मात्र वीज ही मूलभूत सेवा असतानाही विजेचे बिल वेळेत भरण्यास चालढकल करतात. ग्राहकांनी विजेचे वीज बिल वेळेत भरावे, यासाठी वीज अधिकारी- कर्मचाऱ्यांनी थकबाकीदार ग्राहकांची वीज खंडित करण्याची कारवाई करावी, त्या कारवाईत सातत्य राखावे, असे आदेश सहव्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी दिले.