‘त्या’ गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधात आणखी एका शिक्षिकेची तक्रार

संगमेश्वर:- ‘त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्याविरोधात दिवसेंदिवस तक्रारींचा पाढा वाढत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी संगमेश्वरातील एका महिला शिक्षिकेने गटशिक्षणाधिकाऱ्याविरोधात तक्रार केली होती. आता आणखी एका महिला शिक्षिकेने पालकमंत्री, सीईओ यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत गटशिक्षणाधिकारी यांनी जातीवाचक भाषेचा वापर करून या ना त्या कारणाने छळ केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गटशिक्षणाधिकारी याच्या वाढत्या तक्रारींची सीईओ दखल घेऊन कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पालकमंत्री, सीईओ यांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग म्हणून शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण प्रत्येक तालुक्यात पार पडले. या प्रशिक्षणात देण्यात आलेल्या जेवणाबद्दल चौकशी केली म्हणून कडवई येथील एका शाळेत गटशिक्षणाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळा तपासणीच्या नावावर महिला शिक्षिकेचा छळ केला.

शाळा तपासणी करायची म्हणून केंद्र प्रमुख व सहकारी शिक्षक असा एकूण ९ जणांचा फौज फाटा शाळेत पाठविण्यात आला. अधिकारी स्वतः आले. वर्ग तपासणी वेळी संबंधित महिला शिक्षिकेला जाणीवपूर्वक वर्गाच्या बाहेर उभे करून ठेवण्यात आले. रेकॉर्ड तपासणी वेळी रेकॉर्ड संदर्भात बोलताना भात कसा होता? वरण कसं पाहिजे यासाठी ट्रेनिंगला जाता का ? असे प्रश्न विचारण्यात आले. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी शेरा देताना सदर शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करतात असा शेरा जाणीवपूर्वक दिला. याबाबत विचारणा केली असता ‘माझी कुठे करायची तिकडे तक्रार करा, साधीसुधी तक्रार करू नका थेट आयुक्तांना तक्रार करा’ अशी भाषा वापरण्यात आली.

सदर शाळा तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर केंद्र प्रमुख व शिक्षक उपस्थित असताना फक्त चार जणांनीच उपस्थित असल्याची सही केली. इतके लोक आणून सदर शिक्षिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या शिक्षिकेचे मानसिक खच्चीकरण झाले असून त्यांना नैराश्य आले आहे असे त्यांनी म्हटले आहे. झालेल्या प्रकाराची तक्रार त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांच्याकडे केली आहे. आलेल्या नैराश्याने आपण आपल्या जीवाचे काही बरे वाईट केल्यास संबंधित अधिकारी त्याला जबाबदार असतील असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.