त्याने आत्मसात केली पिंपळाच्या पानावर रेखाकृती काढण्याची कला; मिळाला रोजगाराचा नवा मार्ग

रत्नागिरी:- कुणी तांदळाच्या दाण्यावर नाव कोरतं, तर कुणी वाळूमध्ये कलाकृती रेखाटतो. रत्नागिरीतील पानवल-आपकरेवाडीतील केतन बाबल्या आपकरे हा आयटीआयमध्ये शिकणारा तरुण झाडाच्या पानावर शिवाजी, डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह कुणाच्या हुबेहूब प्रतिकृती साकारणारा अवलीया बनला आहे. कोरोनातील टाळेबंदीत घर बसल्या त्याने ही कला अवगत केली. गेल्या दिड वर्षात इन्स्टाग्रामवरुन गुजरात, चेन्नई, तामिळनाडू, तेलंगणातून त्याला ऑर्डरही मिळाल्या असून या कलेतून अथार्जनाचे साधन तयार झाले आहे.


रत्नागिरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सिविल ड्रॉसमन झालेला केतन लॉकडाऊनच्या काळात घरीच होता. केतनला लहानपणापासून चित्र काढण्याची आवड होती. हीच कला त्याच्यासाठी उत्पन्नाचं साधन ठरली आहे. पानावर काढलेलं चित्र त्याच्या पाहण्यात आले होते. तशी चित्र मी काढू शकतो का? असा प्रश्न उपस्थित झाला आणि तो कामाला लागला. लॉकडाऊन काळात पूर्ण वेळ काहीच काम नसल्यामुळे एकाग्रतेने तो झाडांच्या पानावर महापुरुषांची चित्रे रेखाटायला लागला. पानावरील डिटेलिन कोरीव कामासाठी तो ब्लेडचा वापर करत होता. त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत होती. एका फोटोसाठी अर्धा दिवस मेहनत घ्यावी लागते तर दुहेरी फोटोसाठी पूर्ण दिवस लागतो. कोरीव कलेविषयी विविध माहिती त्याने गोळा केली. त्यामधूनच पानावरील कोरीव कामासाठी तो ’पेन नाईट’ ब्लेड वापरु लागला. सुरवातीला वड, फणसाच्या पानावर चित्र काढत होता. सध्या पिंपळाच्या पानावर चित्र काढतो. पिंपळाचं पानावरील चित्र आकर्षक दिसत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याचा सर्वाधिक वापर करत असल्याचे केतनने सांगितले.

केतनने काढलेली चित्रे इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली. या युवा कलाकाराच्या कलाकृतीची दखल घेत गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, चेन्नई येथून त्याला चित्रं काढण्यासाठीच्या ऑर्डर मिळू लागल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यनातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत असून त्याचे या कलेविषयी खास कौतुकही होत आहे. नोकरी नसल्यामुळे घरीच असलेल्या केतनला त्याची ही कला उत्पन्नाचं साधन बनली आहे.