तेल प्रदूषणाचा समुद्रात गंभीर धोका नाही

सिंधुदुर्गातील अपघातग्रस्त तेलवाहू जहाज; तटरक्षक दलाची २४ तास नजर

रत्नागिरी:- देवगड तालुक्यातील विजयदुर्ग ते देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील सुमारे ४० ते ४५ वाव अंतरावर अपघातग्रस्त झालेल्या ‘पार्थ’ या तेलवाहू जहाजातून मोठ्या प्रमाणात तेलाची गळती झाली. रत्नागिरी तटरक्षक दलाने नुकतीच हेलिकॉप्टरने त्याची पाहणी केली. रत्नागिरी ते गोवा या दरम्यान यामुळे तेल प्रदुषणाचा कोणताही गंभीर धोका नसल्याचे तटरक्षक दलाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्ग किनाऱ्यावर तेलाचा पातळ थर आढळला असून त्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता दलाने वर्तवित तेल प्रदूषणाची भिती कमी केली. अपघातग्रस्त जहाजावर २४ तास लक्ष ठेऊन आहेत.  

आठवडाभरापूर्वी विजयदुर्ग ते देवगड दरम्यान खोल समुद्रात ‘पार्थ’ हे तेलवाहू जहाज अपघातग्रस्त झाले आहे. रत्नागिरी तटरक्षक दलाने सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाला तशी माहिती दिली होती. त्यानुसार मालवण येथील मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांनी मच्छीमारांना मासेमारी करताना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जहाजाची लांबी सुमारे १०१ मीटर आहे. जहाज कर्नाटकच्या दिशेने निघाले होते. जहाज अपघातग्रस्त होत असल्याचे जहाजावरील माणसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधला. त्यानुसार जहाजावरील सर्व व्यक्तींना तटरक्षक दलाने रेस्क्युऑपरेशन करून वाचवले. मात्र तेलवाहू जहाज अपघातग्रस्त झाल्याने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर समुद्रात तेल प्रदूषण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. स्थानिक मच्छीमारांनी याबाबत आवश्यक काळजी घेण्याचे सांगण्यात आले होतो.

सिंधुदुर्ग किनार्‍यावर तेलाच्या प्रसाराची पाहणी करण्यासाठी आज रत्नागिरी तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सोडण्यात आले होते. रत्नागिरी ते गोवा या दोन तासांत तेल प्रदूषणाचा कोणताही गंभीर धोका नसल्याचे या पाहणीत दिसुन आले. सिंधुदुर्ग किनार्‍यापासून ७ ते ८ मैल अंतरावर तेलाचा पातळ थर आढळून आला आहे. तो बाष्पीभवन होऊन जाण्याची शक्यता आहे. जहाजाचे व्यवस्थापन करते आणि बुडलेल्या जहाज परिसरावर तटरक्षक दल लक्ष ठेऊन आहे. पाण्यावर पसरलेला तवंग काढण्यासाठी उपायोजना केल्या जात असल्याचे दलाने सांगितले.