‘ती’ बेपत्ता विद्यार्थीनी आढळली मालगुंड येथील नातेवाईकांकडे

100 हून अधिक पोलिसांचे 2 तास शोधकार्य

रत्नागिरी:- जिल्ह्यात मुले पळणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा सर्वत्र पसरत असतानाच शनिवारी सायंकाळी शहरातील एका शाळेतून बाहेर पडलेली विद्यार्थिनी रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने शहरात खळबळ उडाली होती. नातेवाईकांनी पोलीस स्थानकात धाव घेतल्यानंतर पोलिसांसह नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांनी बेपत्ता झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यानंतर संबंधित विद्यार्थिनी मालगुंड येथील आपल्या नातेवाईकांकडे असल्याचे स्पष्ट झाले, त्यावेळी आईसह नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

आर्या अमोल मयेकर (वय 11) ही विद्यार्थिनी शहरातील फाटक हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेते. दररोज सायंकाळी 5:30 वाजल्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती एसटी बसने शिरगाव मयेकरवाडी येथे घरी जाते. मात्र शनिवारी सायंकाळी शाळेतून बाहेर पडलेली आर्या रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचली नाही. सात वाजल्यानंतर नातेवाईक आर्याची शोधा शोध करत होते. परंतु जवळच्या एकाही
नातेवाईकाकडे आर्या नसल्याने नातेवाईकांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले.आर्या बेपत्ता झाल्याची तक्रार देण्याचे काम सुरू असताना पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी सुमारे शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी आर्याच्या शोधासाठी रवाना केले होते. आर्या ज्या भागातून बेपत्ता झाली त्या गाडीतळ परिसरात सर्व दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. गाडीतळ येथील दोन दुकानात आर्या गेली होती. तेथून ती पुन्हा पिकअप शेड जवळ आली. मात्र तेथून ती कुठे गेली याचा शोध लागत नव्हता. याशिवाय सोशल मीडिया वरून आर्या बेपत्ता झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच शहरात खळबळ उडाली. याबाबतची माहिती मालगुंड येथील पोहोचल्यानंतर आर्या ज्या नातेवाईकांकडे होती त्यांनी आर्या आमच्याकडे सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु तब्बल दोन तास नातेवाईकांसह शहर पोलीस आर्याचा शोध घेत होते. त्यानंतर रात्री नऊ वाजता आर्याला घेण्यासाठी त्याचे नातेवाईक मालगुंड येथे रवाना झाले होते.