तीन लाखांच्या चोरीप्रकरणी एकजण ताब्यात

मंडणगड:- तालुक्यातील सडे येथे झालेल्या चोरीप्रकरणात बुलढाणा येथे गेलेल्या मंडणगड पोलिसांच्या तपासपथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपासाला गती मिळाली असून, चोरीचा उलगडा होणार आहे.

नंदकिशोर परशुराम माने (रा. सडे मानेवाडी) यांनी ९ एप्रिल रोजी चोरीची तक्रार पोलिसात दिली होती. तीन अनोळखी व्यक्तींनी २ लाख ९१ हजार रुपये चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणात चोरीचे कोणतेही धागेदोरे, वस्तूस्थितीजन्य पुरावे, सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डिंग उपलब्ध नसतानाही पोलिसांनी तपास सुरू केला. याकरिता तक्रारदाराकडून मिळालेली माहिती आणि सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी माग काढला.

संशयिताच्या मोबाईल लोकेशनचा आधार घेऊन पोलिसांचे पथक औरंगाबाद, बुलढाणा येथे गेले होते. पांदळी शिंदे (पोलिस ठाणे सावखेडनगर, ता. देवगाव) येथून वेदांत दीपक शिंदे (वय २०) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस सखोल चौकशी करत असून, ताब्यात घेतलेल्या संशयिताने दिलेल्या माहितीच्या आधारे मंडणगड पोलिसाचे पथक अन्य दोघांना पकडण्यासाठी ठाणे व कल्याण येथे रवाना झाले आहे.

पथक कोलकात्याला रवाना

म्हाप्रळ येथील ९ लाख ६० हजार रुपयांच्या चोरीच्या तपासासाठी चिकन दुकानाच्या व्यवस्थापकाची माहिती काढून मंडणगड पोलिस ठाण्याचे दुसरे पोलिस पथक कोलकाता येथे रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांनी दिली.