रत्नागिरी:- जिल्हयातील एका तालुक्यातील वसतीगृहामध्ये वास्तव्यास तीन अल्पवयीन विद्यार्थिनींनी फिनेल प्राशन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. या तिन्ही विद्यार्थिनींवर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. वसतीगृहात अभ्यासावरून वारंवार टोमणे मारून बोलले जात असल्याने त्याला कंटाळून त्यांनी विष प्राशन केल्याचे समजते. पोलिसांकडून त्यांचा जबाब घेण्याचे काम सुरू होते.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ७वाजण्याच्या सुमारास या विद्यार्थिनींनी फिनेल प्राशन केले. त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्याने वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी त्यांनी फिनेल प्राशन केल्याची बाब पुढे आली. नंतर अधिक उपचारासाठी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तीनही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर व पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.