तिसंगी येथे भरधाव कारची एसटीला धडक; तीन प्रवासी जखमी

खेड:- तालुक्यातील तिसंगी फोजदारवाडी येथे भरधाव वेगतील कारने एसटी बसला ठोकर देऊन अपघात केल्याने या अपघातात बसमधील ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात आज रविवारी दिनांक ६ रोजी सकाळी ०९:३० वाजता घडला.

मिळालेल्या माहितीनुसार खेड आगारातील चालक आर एस शेवरे हे आपल्या ताब्यातील एस टी बस नंबर एम एच १४ बी टी २५९७ ही खेड ते तिसंगी अशी घेऊन जात असताना तिसंगी कडून खेडच्या दिशेने भरधाव वेगात येणारी होंडा ओक्टिव्हिया गाडी नंबर एम एच ०२ बी टी ४८२६ वरील चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने समोर असणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या समोरील बाजूचा चुराडा झाला आहे. या अपघातात एसटी बस मधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. याअपघाताबाबत खेड पोलिसात एसटी चालकाने फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.