तिकीट आरक्षणात पारदर्शकता; स्वतंत्र यंत्रणेद्वारे व्यक्तीची पडताळणी

रत्नागिरी:- गणेशोत्सव, होळी, उन्हाळी सुट्टीसाठी गाड्या आहेत. रेल्वे आरक्षण ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विविध कठोर नियमांच्या चौकटीतून राबवली जाते. वाढत्या तंत्रज्ञानामुळे एक व्यक्ती वेगवेगळी नावे, मोबाईल नंबर टाकून तिकीट आरक्षित करत असेल तर त्याची वैयक्तिक माहिती, आयपी नंबर, पत्त्यावरून त्याची संपूर्ण माहिती तत्काळ रेल्वे प्रशासनाला समजते. आयआरसीटीसीद्वारे बारीक लक्ष या संपूर्ण प्रक्रियेवर ठेवण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे 120 दिवस आधी कोकणाकडे जाणार्‍या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू झाले. मात्र अवघ्या काही मिनिटांत आरक्षण फुल्ल झाले. यावरुन गदारोळ सुरु झाला आहे. सणासुदीला सर्वांनाच कोकणात जायचे असते. सर्वांच्या हातात आता मोबाईल, लॅपटॉप आहेत. तसेच ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत ते तिकीट खिडक्या उघडण्याची वाट पाहतात. एकाच वेळी शेकडो तिकीट खिडक्यांवर रेल्वेच्या ऑनलाइन पोर्टलवरून हजारो प्रवासी रेल्वे तिकीट आरक्षित करत असल्याने गाड्या फुल्ल होणे साहजिक आहे. याउलट प्रवाशांनी तिकीट आरक्षित करताना रेल्वेच्या विविध राखीव जागांचा, सवलतींचा अभ्यास करून तिकीट आरक्षित केल्यास अडचण येणार नाही, असे रेल्वे प्रशासनाचे मत आहे.

कोकणात गणेशोत्सवात येऊ पाहणार्‍या प्रवाशांची संख्या ही उपलब्ध रेल्वे आणि त्यातील सीट्स यांच्या संख्येपेक्षा किती पटीने अधिक असते. महिना भरापूर्वीच आरक्षणासाठी वापरल्या जाणार्‍या प्रणालीमध्ये बदल करत अत्याधुनिक व अधिक क्षमतेची यंत्रणा बसवल्याने कमी वेळात अधिक लोकांची वेगाने तिकीट आरक्षण झाली. आरक्षण झालेल्या गाड्या या कोकण रेल्वेच्या मार्गावर नियमित धावणार्‍या गाड्या आहेत. पण गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 300 हून अधिक फेर्‍या मारते. ज्यांची आरक्षणे अजून बाकी आहेत. विविध ठिकाणची आरक्षण सेंटर आणि वैयक्तिक यंत्रणेतुन एकाच वेळी तिकीट काढली गेल्याने ती तात्काळ संपली असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एका ट्रेनमध्ये साधारण 800 तिकीट एक व्यक्तीने 4 तिकीट काढली तरी 200 जणांमध्ये ट्रेन पूर्ण भरते. ऑनलाईन आरक्षणामुळे हजारो लोक एकाचवेळी तिकीट काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते फुल होते असे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.