तालुक्यातील युवासेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका 

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप, पावस, मिरजोळे, करबुडे, कोतवडे, खालगाव जिल्हा परिषद गटामध्ये तालुका युवाधिकारी पदांची नियुक्ती करत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युवासेना सज्ज झाली आहे. युवा संघटना मजबूत करण्यासाठी विविध गटातील पदाधिकार्‍यांच्या बैठका घेऊन तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी उपतालुका युवा अधिकारी व विभाग अधिकार्‍यांच्या वरीष्ठांच्या आदेशानुसार या नियुक्त्या केल्या आहेत.

माजी मंत्री व आमदार उदय सामंत यांना पाठिंबा दिल्याने तुषार साळवी यांची युवा संघटना रत्नागिरी तालुकाधिकारी पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर वैभव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, त्यांनीही वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. रत्नागिरीत युवा तालुकाधिकारी पदी काम केलेल्या व शहर संघटक म्हणून कार्यरत असणारे प्रसाद सावंत यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर खासदार विनायक राऊत, आ. व शिवसेना उपनेते डॉ. राजन साळवी, तालुकाप्रमुख बंड्या साळवी व पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सावंत यांनी रत्नागिरी तालुक्यात युवा संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. विविध जि.प. गटात फिरुन त्यांनी युवा कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गोळप व पावस जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका युवाधिकारीपदी गोळप येथील देवेंद्र अडके, खेडशी व झाडगाव म्यु. हद्दीबाहेरील गटासाठी मिरजोळे येथील डॉ. मयुरेश पाटील, करबुडे व कोतवडे गटासाठी मंदार थेराडे यांची उपतालुका युवाअधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. पावस विभाग युवाधिकारीपदी स्वप्नील पाडाळकर, वाटद गटासाठी संकेत चव्हाण, खेडशीसाठी विकास सनगरे, शिरगावसाठी अनिकेत घडशी, खालगावसाठी स्वप्नील शिंदे, करबुडेसाठी संदीप नाखरेकर, गोळपसाठी श्रीकांत मेस्त्री यांची विभाग युवाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.