तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी राहणार उद्धव ठाकरेंसोबत

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात खा. विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्या अनुषंगाने तालुका संघटनेची दिशा कोणती असावी याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. उपस्थितांपैकी सुमारे ९० टक्के पदाधिकाऱ्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले तर काही पदाधिकाऱ्यांनी ना. सामंत यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच आपला निर्णय सांगू असे सांगितले. ना. सामंत यांच्यासोबत राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आपण ना. उदय सामंत यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगितले. या बैठकीला जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा प्रमुख राजू महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख बिपीन बंदरकर व तालुक्यातील विभागप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.